शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने परळी (जि. बीड) येथील संशोधक प्रा. डॉ. गिरीश दशरथ चाटे यांनी नुकतेच एक नाविन्यपूर्ण संशोधन पूर्ण केले आहे. त्यांनी विकसित केलेल्या ‘डीप लर्निंग-बेस्ड सॉईल इमेज रिकग्निशन अँड क्रॉप रिकमेंडेशन डिव्हाइस’ या उपकरणाच्या डिझाइनला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून अधिकृत मान्यता मिळाली असून, त्यांना पेटंट प्रमाणपत्रही जारी करण्यात आले आहे.

तंत्रज्ञानाचा शेतीसाठी वापर सदर उपकरण डीप लर्निंग तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मातीच्या प्रतिमांचे अचूक विश्लेषण करते. या विश्लेषणाद्वारे संबंधित मातीमध्ये कोणते पीक घेणे सर्वाधिक फायदेशीर ठरेल, याची शास्त्रीय शिफारस शेतकऱ्यांना केली जाते. पीक निवडीमधील चुका टाळून उत्पादकता वाढवणे हा या उपकरणाचा मुख्य उद्देश आहे. भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या पेटंट, डिझाइन आणि ट्रेडमार्क कार्यालयाने या उपकरणाच्या डिझाइनची नोंदणी अधिकृतपणे डॉ. गिरीश चाटे यांच्या नावावर केली आहे.

शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचे पाऊल सध्याच्या काळात शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढण्याची नितांत आवश्यकता आहे. मातीचे पारंपरिक पद्धतीने परीक्षण करण्याऐवजी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डीप लर्निंगवर आधारित प्रणाली विकसित करण्याला आता मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. चाटे यांच्या उपकरणाच्या डिझाइनला मिळालेले हे पेटंट कृषी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील एक उल्लेखनीय यश मानले जात आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाचा भविष्यात बळीराजाला मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.