गेवराई तालुक्यातील नंदपूर येथे आठ जणांच्या टोळक्याने बेकायदेशीर गर्दी जमवून एका तरुण शेतकऱ्याला आणि त्याच्या आई-वडिलांना घरासमोरच कुऱ्हाडीच्या दांड्याने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला असून जखमी शेतकऱ्याने बीडच्या शासकीय रुग्णालयात दिलेल्या जबाबावरून १३ ऑक्टोबर रोजी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पांडुरंग माणिक उबाळे (वय ३२, रा. नंदपूर) हे आपल्या घरासमोर असताना गावातीलच योगेश जाधव, श्रीमंत जाधव, वसंत जाधव, राजेश जाधव, गणेश जाधव, रामेश्वर जाधव, ज्ञानेश्वर जाधव आणि जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी येथील दीपक दगडू गिराम या आठ जणांनी गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांच्यावर हल्ला चढवला. आरोपींनी पांडुरंग यांच्यासह त्यांच्या वृद्ध आई-वडिलांना लाथाबुक्क्यांनी तुडवले आणि हातातील कुऱ्हाडीच्या लाकडी दांड्याने प्रहार करून गंभीर जखमी केले. जातेवेळी आरोपींनी कुटुंबाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलीस हवालदार कोरडे पुढील तपास करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!