एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) सक्तीचे केल्याने महामंडळालाच मोठा आर्थिक फटका बसत आहे. कार्ड काढण्यातील तांत्रिक अडचणी आणि प्रशासनाच्या सक्तीमुळे अनेक प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली असून यामुळे महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

राज्यभरात एसटीने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला आणि इतर सवलतधारकांसाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, कार्ड मिळण्यात येणाऱ्या अडचणी, वारंवार सर्व्हर डाऊन असणे आणि नोंदणी प्रक्रियेतील त्रुटींमुळे ग्रामीण भागातील अनेक प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. जुने ओळखपत्र किंवा आधार कार्डवर मिळणारी सवलत नाकारली जात असल्याने नाइलाजाने प्रवाशांना आता खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.

याचा थेट परिणाम एसटीच्या प्रवासी संख्येवर झाला असून महामंडळाच्या महसुलात मोठी घट झाली आहे. आधीच आर्थिक संकटात असलेल्या लालपरीला या नव्या निर्णयामुळे दुहेरी फटका बसला आहे. ग्रामीण भागातील सामान्य प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने कार्ड प्रक्रियेतील जाचक अटी शिथिल करून तांत्रिक अडचणी तत्काळ सोडवाव्यात अशी मागणी आता सर्वसामान्यांमधून जोर धरू लागली आहे.