नवी दिल्ली/बीड: वर्षानुवर्षे उपेक्षित राहिलेल्या मराठवाड्याच्या रेल्वे जोडणीला (रेल्वे कनेक्टिव्हिटी) गती देण्यासाठी आणि बीड जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी खा.बजरंग सोनवणे यांनी दिल्ली दरबारी जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे. खा.सोनवणे यांनी नवी दिल्लीतील 'रेल भवन' येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची विशेष भेट घेऊन मराठवाड्याच्या रेल्वे प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली आणि तीन महत्त्वपूर्ण निवेदने सादर केली.

या भेटीत धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर या नव्या रेल्वे लाईनसाठी आगामी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करणे, अहमदनगर-बीड-परळी मार्गावरील तेलगाव येथे नवीन स्टेशन उभारणे आणि पुणे-बीड एक्सप्रेसला शिरूर तालुक्यातील विघ्नवाडी येथे थांबा देणे, या मुख्य मागण्यांचा समावेश होता. मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर हा नवीन रेल्वे मार्ग अत्यंत धोरणात्मक मानला जातो. या संपूर्ण रेल्वे लाईनचे सर्वेक्षण (सर्वे) पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाचे काम प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी आणि जमिनीच्या अधिग्रहणासह बांधकामाचा मार्ग मोकळा करण्यासाठी आगामी २०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात पुरेशा निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी खासदार सोनवणे यांनी निवेदनाद्वारे केली. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास मराठवाड्यातील तीन प्रमुख जिल्हे थेट एकमेकांशी जोडले जाऊन शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि उद्योजकांना मोठा दिलासा मिळेल, याकडे त्यांनी रेल्वेमंर्त्यांचे लक्ष वेधले. तर अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ या महत्त्वपूर्ण रेल्वे मार्गावर धारूर तालुक्यातील 'तेलगाव' येथे नवीन रेल्वे स्टेशन विकसित करण्यात यावे, अशी मागणी खासदार सोनवणे यांनी दुसऱ्या निवेदनाद्वारे केली. तेलगाव हे धारूर, माजलगाव आणि केज या तीन तालुक्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेले आहे. तसेच ते राष्ट्रीय महामार्गाला लागून असून आसपासच्या २० किलोमीटरच्या क्षेत्रात तीन प्रमुख साखर कारखाने, दिंद्रुड परिसर आणि मोठी बाजारपेठ आहे. तेलगाव येथे स्टेशन उभारून गाड्यांना थांबा दिल्यास या परिसरातील शेतकरी, व्यापारी आणि प्रवाशांचे श्रम, वेळ आणि पैशांची बचत होईल, असा युक्तिवाद त्यांनी मांडला. यासाठी आवश्यक ते सर्वेक्षण व प्रशासकीय प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.

पुणे-बीड-पुणे एक्सप्रेसला विघनवाडीत थांबा द्या
१ पुणे आणि बीड दरम्यान नियमित धावणारी गाडी क्र.११४३३ / ११४३४ 'पुणे-बीड-पुणे एक्सप्रेस' ही या भागातील प्रवाशांसाठी जीवनवाहिनी ठरत आहे. मात्र, सिरूर तालुक्यातील विघ्नवाडी येथे या गाडीला थांबा देण्यात आलेला नाही.
२ विघ्नवाडी आणि परिसरातील शेतकरी, नोकरदार, शिक्षणानिमित्त पुण्याला जाणारे विद्यार्थी यांना या सेवेचा फायदा मिळावा यासाठी विघ्नवाडी येथे या गाड्यांना नियमित थांबा देण्यात यावा, अशी आग्रही मागणी खासदार सोनवणे यांनी तिसऱ्या निवेदनाद्वारे केली.  

प्रशासनाला तात्काळ सूचना; रेल्वेमंत्र्यांचे आश्वासन
खा.बजरंग सोनवणे यांच्या या मागण्या ऐकून घेतल्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संबंधित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असून, आवश्यक ती प्रशासकीय पावले उचलण्याचे निर्देश रेल्वे बोर्डाला दिले आहेत.
या निवेदनांच्या प्रती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, तसेच सोलापूर व पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांना पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.