माजलगाव: बीड जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि गुन्हेगारी प्रवृत्तींविरोधात अत्यंत कठोर पाऊल उचलत माजलगाव तालुक्यातील कुख्यात वाळूमाफिया सुभाष बबन करे याच्यावर ‘एमपीडीए’ कायद्यानुसार स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यामार्फत सादर केलेल्या प्रस्तावाला बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी ११ सप्टेंबर रोजी अंतिम मंजुरी दिली. या मंजुरीनंतर माजलगाव ग्रामीण पोलिसांनी सुभाष करे याला तत्काळ ताब्यात घेऊन मध्यवर्ती कारागृह हर्सूल, छत्रपती संभाजीनगर येथे रवाना केले असून या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
स्थानबद्ध करण्यात आलेला आरोपी सुभाष बबन करे हा माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथील रहिवासी असून त्याच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खुनाचा प्रयत्न करणे, जबर दुखापत करणे, गौण खनिज वाळूची अवैध चोरी, साठा आणि अनधिकृत वाहतूक करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, मारामारी करणे, बेकायदेशीर मंडळी जमवून सार्वजनिक नुकसान करणे तसेच जिवे मारण्याच्या धमक्या देणे यांसारख्या तब्बल चार गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. त्याच्या सततच्या उपद्रवामुळे परिसरातील शांतता धोक्यात आली होती, ज्यामुळे पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी हा प्रस्ताव तयार केला होता.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक आमले आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये माजलगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक विजयकुमार रामोड, सचिन शिंदे, संजय राठोड, महेश विधाने, अभिमन्यू औताडे, आप्पासाहेब घोडके, महेश जोगदंड, गणेश मराठे, बबन सलगर आणि विभीषण चव्हाण यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. भविष्यातही वाळूची अवैध तस्करी, गुटखा विक्री, धार्मिक तेढ निर्माण करणारे घटक, जुगार, लॉटरी आणि हातभट्टी चालवणाऱ्या समाजकंटकांवर एमपीडीए व मोक्का अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिला आहे.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!