बीड जिल्ह्यातील परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले दिवंगत पोलिस अंमलदार सौदागर माणिकराव सावंत यांच्या कुटुंबाला भारतीय स्टेट बँकेच्या 'सॅलरी पॅकेज' विम्यातून एक कोटी रुपयांची मोठी मदत मिळाली आहे. १४ ऑक्टोबर रोजी बीडच्या पोलिस अधीक्षकांच्या हस्ते सावंत यांच्या पत्नी सुनंदा सावंत यांच्याकडे या रकमेचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. कुटुंबाचा मुख्य आधार हरपल्याने आलेल्या मोठ्या संकटात या मदतीमुळे सावंत कुटुंबाला भक्कम आर्थिक बळ मिळाले आहे.

अत्यंत प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावणारे सौदागर सावंत यांचे १६ जानेवारी २०२६ रोजी बीड शहरातील स्वराज्यनगर भागात स्कुटी गतिरोधकावर आदळून झालेल्या दुर्दैवी अपघातात निधन झाले होते. सावंत यांचे वेतन खाते एसबीआयच्या विशेष 'सॅलरी पॅकेज' श्रेणीत असल्याने त्यांना अपघाती विमा संरक्षण लागू होते.

या कठीण काळात एसबीआयचे क्षेत्रीय व शाखा प्रबंधक तसेच बीड पोलिस दलाच्या कल्याण विभागातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कपुरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत संवेदनशीलपणे आणि तत्परतेने कागदपत्रांची पूर्तता केली. पोलिस प्रशासन आणि बँकेने दाखवलेल्या या सहकार्यामुळे एका पोलिस जवानाच्या कुटुंबाला वेळेत न्याय मिळाला असून, या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.