केज: बीड जिल्ह्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, मुक्या जनावरांना जगवणे अशक्य झाल्याने शेतकऱ्यांवर आपली दावणीची जनावरे बाजारात विकण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील साळेगाव येथील प्रसिद्ध आठवडी बाजारात गुरुवारी जनावरांची प्रचंड आवक पाहायला मिळाली. एरवी कोट्यवधींची उलाढाल होणाऱ्या या बाजारात सध्या दुष्काळामुळे खरेदीदार नसल्याने जनावरांचे दर ४० ते ५० टक्क्यांनी घसरले असून, पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलेली जनावरे कवडीमोल भावाने विकताना अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळत आहेत.

पाणी-चाऱ्याची टंचाई अन् जनावरांचे घसरलेले भाव

पावसाअभावी खरिपाची पिके वाया गेली असून जलस्रोत पूर्णपणे आटले आहेत. विहिरी आणि कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत मोठी घट झाल्याने स्वतःसाठी पाणी मिळणे कठीण झाले असताना जनावरांना चारा-पाणी कुठून आणायचे, असा मोठा पेच निर्माण झाला आहे. धाराशिव, लातूर, सोलापूर आदी भागांतूनही या बाजारात मोठ्या प्रमाणावर जनावरे दाखल झाली होती. मात्र, दुष्काळामुळे मागणी घटल्याने जनावरांचे भाव कमालीचे खाली आले आहेत. भाव कमी मिळाला तरी चालेल, पण मुके जनावर कसायाच्या स्वाधीन करणार नाही, अशी उद्विग्न भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

छावणीऐवजी थेट दावणीला चारा देण्याची मागणी

दरम्यान, चारा छावण्यांमध्ये लाळ्या-खुरकूत, लंपी, घटसर्प आणि फऱ्या यांसारख्या संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे शासनाने चारा छावण्या सुरू करण्याऐवजी थेट शेतकऱ्यांच्या दावणीलाच चारा-पाण्याची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक शेतकरी व पशुपालकांमधून केली जात आहे. शासनाने या गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन ठोस उपाययोजना करावी, अशी आर्त हाक दुष्काळग्रस्त बळीराजाने दिली आहे.