अंबाजोगाई: लोखंडी सावरगाव येथील 'वृद्धत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्रात' कार्यरत असलेल्या कर्तव्यदक्ष टेली मानस समुपदेशक स्व. अहिल्या पांडुरंग गंगणे (शिंदे) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सोमवारी (२६ ऑक्टोबर) भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात त्यांच्या निस्वार्थ कार्याला मानवंदना देत तब्बल ३७ जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
या कार्यक्रमाला रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. अरुणा केंद्रे, डॉ. चंद्रकांत चव्हाण आणि डॉ. गायकवाड, शेख मॅडम, समाजसेवा अधीक्षक रसाळ, टेली मानसचे प्रकल्प समन्वयक सुजितकुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉ. अरुणा केंद्रे यांनी स्व. अहिल्या गंगणे यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या की, अहिल्या या त्यांच्या कामाशी अत्यंत प्रामाणिक होत्या. स्वतःला गंभीर आजार झालेला असतानाही त्यांनी रुग्णांचे समुपदेशन करण्याचे महान कार्य अविरत सुरू ठेवले. त्यांचा स्वभाव अतिशय शांत आणि मनमिळावू होता. त्यांच्या याच चांगल्या स्वभावामुळे आज त्यांच्या पश्चातही एवढ्या मोठ्या संख्येने लोक स्वेच्छेने रक्तदान करण्यासाठी पुढे आले आहेत, हीच त्यांच्या कार्याची खरी पावती आहे. यावेळी सर्व उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्व. अहिल्या गंगणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
स्व. अहिल्या गंगणे या एक अत्यंत प्रभावी आणि कार्यतत्पर समुपदेशक म्हणून ओळखल्या जात. त्यांनी मानसिक आरोग्य केंद्रात अनेक रुग्णांना मोठा मानसिक आधार दिला होता. त्यांचे आजोळ हातोला, मूळ गाव भारज आणि सासर राडी हे होते. या शिबिरामध्ये भारज, राडी आणि हातोला या तिन्ही गावांतील ग्रामस्थांसह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान केले आणि कर्तव्यदक्ष समुपदेशक अहिल्या यांना आदरांजली अर्पण केली.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!