परळी: मुलीला आणि स्वतःला जावयाकडून तसेच त्याच्या कुटुंबीयांकडून वारंवार होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून ४५ वर्षीय व्यक्तीने स्वतःच्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परळी तालुक्यातील मालेवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात जावयासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगिता वैजनाथ मुंडे (वय ४२, राहणार मालेवाडी, परळी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची मुलगी मनीषा हिचे लग्न अनंत पाटलोबा गित्ते याच्यासोबत झाले होते. मागील दोन महिन्यांपासून जावई आणि मुलीमध्ये वाद होत असल्याने ती माहेरी राहत होती. १९ सप्टेंबर रोजी जावई अनंत गित्ते याने फिर्यादीचे पती वैजनाथ संभाजी मुंडे (वय ४५, राहणार मालेवाडी) यांना फोनवरून शिवीगाळ केली. अनंत गित्ते, त्याचे वडील पाटलोबा ज्ञानोबा गित्ते आणि मैत्रीण शुभांगी (सर्व राहणार वनसवाडी, परळी) यांच्याकडून मुलीचा आणि वैजनाथ यांचा मानसिक छळ होत होता. या तणावातून २० सप्टेंबर रोजी सकाळी वैजनाथ मुंडे यांनी शेतात विषारी औषध प्राशन केले. उपचारादरम्यान खाजगी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी वैजनाथ यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून, त्यात या तिघांनी अपमान केल्याचे नमूद आहे.
या घटनेनंतर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रियाज शेखलाल शेख हे करीत असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!