बीड: जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसानीची भरपाई दिवाळीपूर्वी मिळवून देण्यासाठी प्रशासनाने पीक कापणी प्रयोग निर्धारित वेळेत पूर्ण करून नुकसानीची अचूक नोंद घ्यावी, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय आंतरमंत्रालयीन पथकाचे प्रमुख तथा केंद्रीय कृषी विभागाचे संयुक्त सचिव मुक्तानंद अग्रवाल यांनी दिले. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित दुष्काळी परिस्थितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी राज्याचे कृषी सचिव परिमल सिंग, जिल्हाधिकारी डॉ. विवेक जॉन्सन यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पावसाच्या प्रदीर्घ खंडाने ७.४२ लाख हेक्टरवरील पिके बाधित

जिल्ह्यात यंदा सरासरीच्या केवळ ६२.८९ टक्के पाऊस झाल्याने खरीप हंगामाला मोठा फटका बसला आहे. पेरणी झालेल्या ७ लाख ८७ हजार २१८ हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल ७ लाख ४२ हजार १६३ हेक्टरवरील पिके पावसाच्या खंडामुळे बाधित झाली असून १ हजार ३५३ गावांतील ८ लाख २२ हजारांहून अधिक शेतकरी संकटात सापडले आहेत. पीक कापणी प्रयोगांच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, सोयाबीनचे सरासरी उत्पादन हेक्टरी १ हजार ५३४ किलोवरून थेट ४१० किलोपर्यंत घसरले आहे. त्यामुळे प्रलंबित प्रयोग दिवाळीपूर्वी वेगाने पूर्ण करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश अग्रवाल यांनी दिले.

धरणांमध्ये अवघा १४.६१ टक्के पाणीसाठा; चाऱ्याचा प्रश्न बिकट

जिल्ह्यातील १६४ प्रकल्पांमध्ये सध्या केवळ १४.६१ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून भूजल पातळीत सरासरी ४.५५ मीटरने घट झाली आहे. त्यामुळे बीड आणि अंबाजोगाई शहरांसह ग्रामीण भागासाठी टँकर व पर्यायी पाणीपुरवठ्याचे काटेकोर नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले. दुसरीकडे, जिल्ह्यातील जनावरांसाठी उपलब्ध चारा सरासरी केवळ ४७ दिवस पुरेल इतकाच शिल्लक असून शिरूर कासार, गेवराई आणि आष्टी तालुक्यांत स्थिती अधिक गंभीर आहे. यावर मात करण्यासाठी चारा पिकांचे क्षेत्र वाढवणे, मका बियाणे वाटप आणि रोजगार हमी योजनेतून जलसंधारणाची कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना बैठकीत मांडण्यात आल्या.