केज: आगामी खरीप हंगामात उत्पादन खर्च कमी करण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांनी स्वतःचे दर्जेदार बियाणे तयार करावे, यासाठी कृषी विभागाच्या वतीने तालुक्यातील कोल्हेवाडी, जीवाचीवाडी आणि तरनळी येथे सोयाबीन पिकाची शेतीशाळा घेण्यात आली. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) आयोजित या शेतीशाळेत शेतकऱ्यांना सोयाबीनची शास्त्रीय पद्धतीने कापणी, मळणी, साठवणूक आणि केंद्रीय बँक डिजिटल चलनाच्या (सीबीडीसी) अनुदानाविषयी सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे, उपविभागीय कृषी अधिकारी राहुल गायकवाड व तालुका कृषी अधिकारी सागर पठाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.

शास्त्रीय कापणी, मळणी व साठवणूक तंत्र

उपविभागीय तंत्रज्ञान समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी शेतकऱ्यांना बुरशीजन्य रोगग्रस्त पिकांची पाहणी करून मार्गदर्शन केले. काढणी करताना रोगट किंवा चिखलात बुडालेली झाडे बियाण्यासाठी निवडू नयेत, असा सल्ला त्यांनी दिला. झाडे उपटल्यास मुळांमार्फत माती मालात मिसळून भाव कमी मिळतो, त्यामुळे विळ्याच्या साहाय्यानेच कापणी करावी. तसेच मळणी यंत्राची गती प्रतिमिनिट ३०० ते ३५० फेरे ठेवावी जेणेकरून बियाणे फुटणार नाही. बियाणे उन्हात वाळवून ओलावा १२ टक्क्यांपेक्षा कमी झाल्यानंतरच सुतळी पोत्यात हवेशीर जागी साठवावे आणि पोत्यांची थप्पी ७ फुटांपेक्षा जास्त उंच ठेवू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

सीबीडीसीद्वारे सिंचन संचासाठी आगाऊ अनुदान

दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी ठिबक व तुषार सिंचनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. सिंचन संच खरेदीसाठी शेतकऱ्यांना सुरुवातीला येणारी आर्थिक अडचण दूर करण्यासाठी सीबीडीसी प्रणालीद्वारे डिजिटल टोकन क्यूआर कोड स्वरूपात आगाऊ अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. या अनुदानाचा वापर करून नोंदणीकृत विक्रेत्यांकडून संच खरेदी करता येईल, अशी माहिती येळकर यांनी दिली.

या प्रशिक्षणास समूह सहाय्यक विवेकानंद आदमाने यांच्यासह बालासाहेब चाळक, हनुमान मेटे, अरुणा मेटे, शामल मेटे, प्रेमा चाळक, अनिता मेटे, परमेश्वर चौरे, भारत चाटे, ज्ञानोबा सारूक यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.