अंबाजोगाई: नवीन घर घेण्यासाठी माहेरून १४ लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वैभवी मुकेश पाटील (वय २६, सध्या रा. प्रशांत नगर, अंबाजोगाई, मूळ रा. केशव नगर, पुणे) यांच्या फिर्यादीवरून त्यांचे पती मुकेश मधुकर पाटील, सासू मोहिनी मधुकर पाटील, सासरे मधुकर आनंतराव पाटील, दीर मंथन मधुकर पाटील आणि जाऊ मयुरी महेश पाटील (सर्व रा. केशव नगर, मुंढवा, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लग्नावेळी मुकेश पाटील याने आयटी कंपनीत नोकरी व ३० एकर जमीन असल्याचे खोटे सांगितले होते. लग्नानंतर नवीन घर घेण्यासाठी १४ लाख रुपयांची मागणी करत सासरच्या मंडळींनी संगनमत करून विवाहितेचे दागिने काढून घेतले आणि तिला उपाशीपोटी ठेवून मारहाण केली. विवाहिता गरोदर असताना तिला गर्भपातासाठी सक्ती करून घराबाहेर काढण्यात आले. नंतर आळंदी येथे राहत असताना पतीने तिला बाथरूममध्ये कोंडून बेदम मारहाण केली. त्यानंतर अंबाजोगाई येथे माहेरी बाळंतपणासाठी आलेल्या विवाहितेला भेटण्याच्या बहाण्याने पतीने येऊन तिला मारहाण केली व १४ लाख रुपये न आणल्यास तिला आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली.

भरोसा सेलमध्ये या प्रकरणी कोणतीही तडजोड न झाल्याने अखेर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात विवाहितेच्या फिर्यादीवरून सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मनीषा चाटे या करत आहेत.