बीड जिल्ह्यातील अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवगण राजुरी येथे धडक कारवाई करत ६० किलो ७० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. शुक्रवारी (९ ऑक्टोबर) रात्री उशिरा केलेल्या या कारवाईत तब्बल ३० लाख ३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका साठ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे.
छापा आणि मुद्देमाल जप्ती
पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अमली पदार्थांविरुद्ध विशेष मोहीम राबवली जात आहे. नवगण राजुरी येथील गौसखान ऊर्फ बाबू उमरखान पठाण (वय ६०) याने अवैध विक्रीसाठी घरात मोठ्या प्रमाणावर गांजा साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे ९ ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या पथकाने संबंधित घरावर अचानक छापा टाकला. त्यावेळी घरात चार वेगवेगळ्या गोण्यांमध्ये लपवून ठेवलेला साठ किलोपेक्षा अधिक वजनाचा गांजासदृश अमली पदार्थ आढळून आला.
गुन्हा दाखल आणि पोलिसांचे आवाहन
पोलिसांनी वजनकाट्यावर मोजमाप करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत ३० लाखांचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपी गौसखान पठाण याच्याविरुद्ध बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २०(ब)(ii)(क) अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर अधीक्षक समीर शेख व उपविभागीय अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बंटेवाड, बीड ग्रामीणचे निरीक्षक सोमनाथ जाधव आणि त्यांच्या पथकाने केली. अमली पदार्थांची विक्री आणि तस्करी करणाऱ्यांची माहिती नागरिकांनी 'अमली पदार्थ विरोधी कक्ष'च्या ९२७०२४३२०० या क्रमांकावर निर्भयपणे द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन बीड पोलीस दलाने केले आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!