परळी वैजनाथ (प्रतिनिधी) - बीड जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्यासाठी ग्लोबल विकास ट्रस्टने (GVT) मांडलेल्या व्यापक उपक्रमाला राज्य शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ ऑक्टोबर रोजी जलनायक मयंक गांधी यांना पत्र पाठवून उपक्रमाचे स्वागत केले असून, ग्लोबल विकास ट्रस्ट आणि जिल्हा प्रशासनातील भागीदारी सामंजस्य कराराद्वारे (MoU) औपचारिक करण्याची तयारी दर्शविली आहे.

ग्लोबल विकास ट्रस्टच्या आराखड्यात ५० हजार शेतकऱ्यांसाठी क्लस्टर आधारित उपजीविका, १५ हजार शेतकऱ्यांना रेशीम शेतीशी जोडणे, मूल्यवर्धनाच्या सुविधा आणि ग्रामीण रोजगाराला चालना देण्याचा समावेश आहे. जलसंधारणासाठी १ हजार किलोमीटर हंगामी नद्या व उपनद्यांचे पुनरुज्जीवन, १५० केटी वेअर, ५०० सिमेंट नाला बांध, ३ हजार GRA, भूमिगत बंधारे, सीसीटी, डीप सीसीटी, कंटूर बंडिंग आणि १ हजार शेततळी उभारण्याचे उद्दिष्ट प्रस्तावित आहे.

या उपक्रमासाठी जिल्हा प्रशासनामार्फत शासकीय योजनांचे अभिसरण, आवश्यक मंजुरी, नियमित आढावा आणि प्रशासकीय सहकार्य देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळे बीडमध्ये जलसंधारण, शेती, रेशीम, फलोत्पादन आणि ग्रामीण रोजगार यांना एकत्रितपणे जोडणाऱ्या विकास मॉडेलला संस्थात्मक स्वरूप मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्राची प्रत उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. आनंद बंग यांना देण्यात आली आहे.

अधिक जलद आणि अधिक व्यापक - मयंक गांधी

विशेषतः यावर्षी दुष्काळाची परिस्थिती असताना, या सहकार्यामुळे आम्हाला मराठवाड्यातील ज्या शेतकऱ्यांना सर्वाधिक मदतीची गरज आहे, त्यांच्यापर्यंत अधिक जलद गतीने आणि व्यापक प्रमाणात पोहचणे शक्य होणार असल्याची प्रतिक्रिया जलनायक मयंक गांधी यांनी व्यक्त केली.