बीड शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या टोळीचा सुळसुळाट पुन्हा एकदा समोर आला आहे. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास बसमधून खाली उतरणाऱ्या एका ६० वर्षीय वृद्ध महिलेची सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल असलेली पिशवी एका अज्ञात महिलेने लंपास केली. या चोरीत वृद्धेचा एकूण ५७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यामधील गेवराई मर्दा येथील रहिवासी सुलाबाई भास्कर दौड (वय ६०) या प्रवासासाठी बीड बसस्थानकात आल्या होत्या. सकाळी ११.२५ वाजता त्या बसमधून खाली उतरत असताना पाठीमागे असलेल्या एका अनोळखी महिलेने संधी साधून त्यांच्या हातातील पिशवी अलगद पळवून नेली. या पिशवीत ३५ हजार रुपयांचे १० ग्रॅम सोन्याचे मणी व ओम, २० हजार रुपयांचा ७ ग्रॅमचा सोन्याचा सेव्हनपीस दागिना, १ हजार रुपयांचा आयटेल मोबाईल आणि १४०० रुपयांची रोकड असा ५७ हजार ४०० रुपयांचा ऐवज होता. वृद्धेच्या तक्रारीवरून ग्रेड पोलीस उपनिरीक्षक राख या चोरट्या महिलेचा शोध घेत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!