माजलगाव: ब्लॅकमेल करून शारीरिक सुखाची मागणी करणाऱ्या तरुणाच्या त्रासाला कंटाळून एका २० वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना २३ सप्टेंबर २०२६ रोजी तानाजीनगर येथे घडली. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

मृत महिलेच्या वडिलांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. राहुल ऊर्फ बबलू भभवा पवार (रा. जुना कोर्ट रोड, अशोक लॉजसमोर, माजलगाव) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. आरोपी राहुल याने चार ते पाच महिन्यांपूर्वी फिर्यादी यांच्या मुलीच्या घरी जाऊन तिच्यावर बळजबरी करत तिचे फोटो काढले होते. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तो विवाहितेकडे वारंवार शारीरिक सुखाची मागणी करत होता. यापूर्वी कुटुंबीयांनी आरोपीला समज देऊनही त्याने आपला जाच थांबवला नाही. आरोपीच्या या सततच्या ब्लॅकमेलिंग आणि बदनामीच्या भीतीला कंटाळून पीडित महिलेने स्वतःच्या राहत्या घरी साडीने गळफास घेत जीवनयात्रा संपवली. मृत महिलेला तीन वर्षांची मुलगी आणि दीड वर्षाचा मुलगा आहे.   

घटनेच्या दिवशीही आरोपी पीडितेला भेटल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये निष्पन्न झाले आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून राहुल पवार याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०८ आणि ३५२ अन्वये माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गंभीर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी पवार हे करीत आहेत.