राज्य शासनाने कोट्यवधी रुपयांची बिले न दिल्यामुळे राज्यातील शासकीय रुग्णालयांतर्गत चालवली जाणारी मोफत 'महालॅब' रक्तचाचणी सेवा अचानक बंद पडली आहे. या भोंगळ कारभाराचा सर्वाधिक फटका भंडारा जिल्ह्यासह राज्यभरातील गरोदर माता, वृद्ध आणि गरीब रुग्णांना बसत आहे.

अनुदान न मिळाल्याने संबंधित खासगी एजन्सीने काम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, शासकीय रुग्णालये, 'आपला दवाखाना' आणि डायलिसिस केंद्रांवर उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आता नाइलाजाने खासगी प्रयोगशाळांमध्ये जाऊन पैशांचा भुर्दंड सोसत महागड्या चाचण्या कराव्या लागत आहेत. आरोग्यासारख्या अत्यंत संवेदनशील प्रश्नावर प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अक्षरशः कोलमडून पडली आहे. शासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन थकीत बिले अदा करावीत आणि गरिबांसाठीची ही जीवनदायी सेवा त्वरित पूर्ववत करावी, अशी संतप्त मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.