अंबाजोगाई: व्हिएतनाममधील दा नांग येथे १३ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित 'व्हिएतनाम ऑप्थॅल्मॉलॉजी कॉन्फरन्स'साठी (VOS 2026) पुण्यातील प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ आणि अंबाजोगाईचे सुपुत्र डॉ. आनंद देशपांडे यांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. अरीयाना इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय परिषदेत ते १४ नोव्हेंबर रोजी प्रगत लेन्सेस आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियेतील अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आपले संशोधन व अनुभव सादर करणार आहेत.
या जागतिक परिषदेत दीड हजारांहून अधिक आंतरराष्ट्रीय नेत्रतज्ज्ञ सहभागी होणार आहेत. त्यांच्यासमोर डॉ. देशपांडे हे 'पेंटाफोकल डिझाइनमुळे दृष्टी सुधारते का?' या विषयावर तीन प्रीमियम आयओएल (IOL) लेन्सचे तुलनात्मक विश्लेषण मांडणार आहेत. मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चष्म्यावरील अवलंबित्व कायमस्वरूपी कमी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या या आधुनिक तंत्रज्ञानावर व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित करण्यात आलेले ते भारतातील एकमेव तज्ज्ञ आहेत. या परिषदेत ते रोबोटिक कॅटरॅक्ट सर्जरी आणि नव्या तंत्रज्ञानावरील प्रात्यक्षिकेही उपस्थित डॉक्टरांसमोर मांडतील.
मूळचे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईचे असलेले डॉ. आनंद देशपांडे यांनी पुण्यात 'देशपांडे आय हॉस्पिटल अँड लेसर सेंटर'च्या माध्यमातून नेत्रचिकित्सा क्षेत्रात स्वतःची भक्कम ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोथरूड, पिरंगुट, देहू आणि कोथरूड ॲनेक्स येथे आधुनिक सुविधांनी युक्त अशा वैद्यकीय शाखा कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांच्या रुग्णालयात अत्याधुनिक 'पॅनऑप्टिक्स प्रो लेन्स'चे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले होते. मोतीबिंदू शस्त्रक्रियेत असा प्रगत आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रयोग करणारे ते महाराष्ट्रातील पहिलेच रुग्णालय ठरले होते.
डॉ. देशपांडे हे 'हनिता एक्सटेंड आयओएल'चे पहिले प्रत्यारोपण करणारे तज्ज्ञ असून ते जागतिक तज्ज्ञ समितीचे सदस्यही आहेत. त्यांची ही निवड म्हणजे त्यांच्या अनेक वर्षांच्या शल्यचिकित्सा अनुभवाची, संशोधन कार्याची आणि आधुनिक नेत्रोपचार क्षेत्रातील योगदानाची आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतलेली दखल मानली जात आहे. अंबाजोगाईसारख्या ठिकाणाहून जाऊन वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन विक्रम प्रस्थापित करणाऱ्या डॉ. देशपांडे यांच्या या यशामुळे स्थानिक पातळीवरून तसेच वैद्यकीय वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!