​अंबाजोगाई: तालुक्यातील घाटनांदूर येथील जाधव कुटुंबाने जुन्या रूढी-परंपरांना फाटा देत समाजासमोर एक अत्यंत स्तुत्य आणि पर्यावरणपूरक आदर्श निर्माण केला आहे. रविवार, १५ नोव्हेंबर रोजी ९७ वर्षीय पंडित किशनराव जाधव यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाने नदीत अस्थी विसर्जन करून जलप्रदूषण करण्याऐवजी, एका खड्ड्यात अस्थी ठेवून त्यावर थेट वृक्षारोपण करत त्यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे.

​संत तुकाराम महाराजांच्या 'वृक्ष वल्ली आम्हा सोयरे' या विचाराला जाधव कुटुंबीयांनी खऱ्या अर्थाने कृतीत उतरवले. अस्थींवर आंबा आणि नारळाची सहा झाडे लावली असून, या वृक्षांच्या रूपाने पंडितराव यांची स्मृती कायम हिरवीगार राहील, अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

​अस्थी विसर्जनामुळे नद्यांचे होणारे प्रदूषण थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ दुःख करत न बसता अंत्यसंस्काराचा भाग म्हणून निसर्ग रक्षणाचा दिलेला हा संदेश अतिशय प्रेरणादायी असून, जाधव कुटुंबाच्या या स्तुत्य पावलाचे संपूर्ण बीड जिल्ह्यातून मोठे कौतुक आणि स्वागत होत आहे.