अंबाजोगाई(प्रतिनिधी ) - सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असून या युगात विद्यार्थ्यांनी ज्ञान, कौशल्य तसेच सामाजिक बांधिलकी यांचा समन्वय साधून कार्य केले पाहिजे असे मत कृष्णा खोरे विकास महामंडळाचे निवृत्त संचालक व योगेश्वरी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी राम घोटे यांनी व्यक्त केले.

योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित कृ.पु. चौसाळकर तंत्रनिकेतन मध्ये पू. स्वामी रामानंद तीर्थ जयंती निमित्तच्या कार्यक्रमात बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे संचालक प्रताप पवार होते. पुढे बोलताना राम घोटे म्हणाले की, विकसित भारताच्या निर्मितीमध्ये अभियंत्यांची भूमिका अत्यंत महत्वाची असून पुढील काळात तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढताना दिसेल विद्यार्थ्यांनी नवकल्पना साकार करून देशाच्या विकासासाठी हातभार लावावा त्यांनी कौशल्यांविषयीही मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या प्रास्तविकात प्राचार्य रमण देशपांडे यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्याचा व विचारांचा परिचय करून देऊन विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रेरणेतून राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात योगदान देण्याचे असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रियंका गंभीरे तर आभार प्रा. के.पी.इंगोले यांनी मानले.यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.