केज दि. २४ (प्रतिनिधी): मांजरा धरणाच्या लाभक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या गळीत हंगामात योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. केज तालुक्यातील सोनेसांगवी येथे बुधवारी सायंकाळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत उसाला विनाकपात पहिली उचल प्रतिटन ४,२५० रुपये आणि अंतिम दर ५,००० रुपये जाहीर करण्याची एकमुखी मागणी करण्यात आली. दुष्काळी स्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात असल्याने साखर कारखान्यांनी गाळप सुरू करण्यापूर्वीच हा दर लेखी परिपत्रकाद्वारे जाहीर करावा, असा ठराव शेतकऱ्यांनी मंजूर केला.
दुष्काळात उसाला हमीभाव आणि शासकीय अनुदानाची गरज
कमी पावसामुळे यंदा बीड जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, तूर आणि बाजरी यांसारखी खरीप पिके पूर्णपणे हातची गेली आहेत. पाण्याअभावी ऊस जगवण्यासाठी झालेला प्रचंड खर्च आणि त्यामुळे घटलेले उत्पादन यामुळे ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अंबासाखर, येडेश्वरी, रांजणी आणि गंगामाऊली कारखाना कार्यक्षेत्रात संघटनेने जनजागृती मोहीम सुरू केली आहे. बैठकीत गतवर्षीच्या उर्वरित दराची रक्कम तात्काळ खात्यावर वर्ग करावी आणि दुष्काळामुळे उसाचे वजन निम्म्याने घटल्याने राज्य शासनाने प्रतिटन ५०० रुपये अनुदान द्यावे, अशी ठाम भूमिका घेण्यात आली.
कारखानदारांच्या नफेखोरीविरोधात आंदोलनाचा इशारा
बैठकीस मार्गदर्शन करताना कुलदीप करपे यांनी स्पष्ट केले की, शेतकरी संकटात असताना साखर कारखाने आणि गूळ उत्पादकांनी नफेखोरी थांबवून शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. मागण्या मान्य न झाल्यास जिल्ह्यात ठिकठिकाणी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी ज्येष्ठ शेतकरी नेते सतीश शिंदे, तालुकाध्यक्ष दिलीप लोंढे, प्रमोद जाधव, शुभम राऊत यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांनी हात उंचावून या मागण्यांना पाठिंबा देत आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!