केज: वाढदिवसाचा केक सुरीऐवजी तलवारीने कापून दहशत माजवण्यासाठी त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या दोघांना केज पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून एक तलवार आणि दोन खंजीर जप्त केले असून, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
सोशल मीडियावर रील व्हायरल होताच कारवाई
केज येथे ६ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास अजय अशोक तांदळे याने साथीदारांसह तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला होता. परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल करण्यात आला. हा व्हिडिओ निदर्शनास येताच पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या सूचनेनुसार डीबी पथकाने तत्काळ हालचाली सुरू केल्या. सहाय्यक पोलिस निरीक्षक लक्ष्मण उंबरे, पोलिस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इनामदार आणि पथकाने मोबाईल लोकेशनच्या आधारे अजय तांदळे व सदाशिव नामदेव आंधळे या दोघांना ताब्यात घेतले.
शस्त्रास्त्रांचा साठा जप्त; पोलिस कोठडी
पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर सदाशिव आंधळे याच्या नामेवाडी येथील घरातून म्यान असलेली तीन फूट लांबीची तलवार आणि झडतीदरम्यान ६ व ८ इंच लांबीचे दोन खंजीर जप्त केले. या प्रकरणी दोघांविरुद्ध भारतीय शस्त्र प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवून त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १२ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आणि दहशत निर्माण करण्यासाठी सोशल मीडियावर रील्स अथवा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर अशीच कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी दिला आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!