अंबाजोगाई/कोल्हापूर: श्रीलंकेतील कॅन्डी येथे नुकत्याच पार पडलेल्या १३ व्या इंडो-श्रीलंका आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना चिमुकल्या शिवाय अक्षरा महेश्वर शितोळे याने सुवर्णपदक पटकावून देशाचे नाव उंचावले आहे. कोल्हापूरच्या न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता दुसरीत शिकणारा शिवाय हा अंबाजोगाईचे रहिवासी चंद्रकांत लोमटे यांचा नातू आहे. त्याच्या या गगनभरारीमुळे अंबाजोगाई शहरासह संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
कुमिते प्रकारात अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात शिवायने आपल्या प्रतिस्पर्ध्याला ६-० अशा मोठ्या फरकाने धूळ चारत प्रथम क्रमांक मिळवला आणि भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. विशेष म्हणजे, यापूर्वी नेपाळमधील काठमांडू येथे झालेल्या ११ व्या ज्युनियर आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतही त्याने रौप्यपदक जिंकले होते.
कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर लहानग्या शिवायने मिळवलेल्या या दैदिप्यमान यशामागे त्याचे प्रशिक्षक रमेश पिसाळ, सुषमा पिसाळ आणि आई-वडील डॉ. अक्षरा व महेश्वर शितोळे, आजी-आजोबा डॉ. आशा व डॉ. दत्तात्रय शितोळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. या सुवर्णमयी कामगिरीनंतर शिवायसह शितोळे आणि लोमटे कुटुंबावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!