बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील आनंदवाडी येथे दारूच्या नशेत पोलिसांना वारंवार फोन करून आत्महत्येची खोटी धमकी देणाऱ्या एका ५५ वर्षीय व्यक्तीवर चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्जुन लक्ष्मण रोमन असे या आरोपीचे नाव असून, केवळ पोलिसांची फिरकी घेण्यासाठी त्याने 'डायल ११२' या आपत्कालीन सेवेचा गैरवापर केल्याचे उघड झाले आहे.
१६ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजल्यापासून अर्जुन रोमन याने 'डायल ११२' वर वारंवार फोन करून, "मला तात्काळ मदत द्या, अन्यथा मी आत्महत्या करेन," अशी भयंकर धमकी दिली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून एका जिवाची पर्वा करत चकलांबा पोलिसांचे पथक तात्काळ आनंदवाडीत पोहोचले. मात्र, शोध घेतला असता हा व्यक्ती पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांच्या चौकशीत त्याने कोणतीही अडचण नसून केवळ दारूच्या नशेत मजेसाठी आणि पोलिसांना त्रास देण्यासाठी हे कृत्य केल्याची धक्कादायक कबुली दिली.
या खोट्या कॉल्समुळे शासकीय यंत्रणेचा वेळ आणि मनुष्यबळ विनाकारण वाया गेल्याने, पोलीस शिपाई मुकेश बनसोडे यांच्या फिर्यादीवरून अर्जुनविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम २१७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांनी 'डायल ११२' या महत्त्वाच्या सेवेचा असा गैरवापर करू नये, जेणेकरून खऱ्या गरजू व्यक्तींपर्यंत वेळेत मदत पोहोचेल, असे आवाहन बीड पोलिसांनी केले आहे.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!