बीड शहरातील अंबिका चौक परिसरातील किराणा दुकानाचे शटर तोडून रोख रक्कम चोरणाऱ्या तरुणास शिवाजीनगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक केली आहे. ओम महेश गायकवाड (वय २३, रा. माऊली नगर, पांगरी रोड, बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्या चौकशीतून धाराशिव जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीचे तीन गुन्हेही उघडकीस आले आहेत.

सीसीटीव्ही फुटेजवरून लागला छडा

पांगरी रोडवरील शिवराय कॉलनीतील रहिवासी चैतन्य सखाराम हुरकुडे (वय २९) यांचे अंबिका चौकात 'ज्ञानेश्वर किराणा स्टोअर्स' नावाचे दुकान आहे. १४ नोव्हेंबर रोजी रात्री १० ते १५ नोव्हेंबरच्या सकाळी ८ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने दुकानाच्या लोखंडी शटरचे कुलूप तोडून काऊंटरमधील ५ हजार रुपये रोख लंपास केले होते. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमधील संशयिताची फिर्यादीने ओळख पटवताच पोलिसांनी १६ नोव्हेंबर रोजी रात्री ११.५३ वाजता आरोपी ओम गायकवाड याला ताब्यात घेतले.

दुचाकी चोरीचे आंतरजिल्हा कनेक्शन उघड

पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली एक लाख रुपये किमतीची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल (क्र. एमएच २५ एव्ही ७५६६) जप्त केली. या गाडीची सखोल चौकशी केली असता ती चोरीची असल्याचे समोर आले. आरोपीने ही दुचाकी धाराशिव येथून चोरल्याची कबुली दिली असून, याशिवाय आपल्या साथीदारांच्या मदतीने धाराशिवमधून आणखी दोन मोटारसायकली चोरल्याचे सांगितले. याप्रकरणी धाराशिव येथील आनंदनगर आणि येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. चोरीस गेलेली रोकड, इतर साथीदार आणि उर्वरित वाहने हस्तगत करण्यासाठी आरोपीला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे.

पोलीस पथकाची यशस्वी कामगिरी

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, पोलीस हवालदार रवी आघाव, पोलीस शिपाई दिलीप राठोड, शुभम सोनवणे, अनिल घटमल व अशोक राडकर यांच्या पथकाने पार पाडली.