केज: शहरातील जिल्हा परिषद उर्दू कन्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करत असताना एका ५१ वर्षीय शिक्षकाचा विजेचा तीव्र धक्का लागून मृत्यू झाला. मुबशिरोद्दीन अमिनोद्दीन इनामदार असे या मृत शिक्षकाचे नाव आहे. आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास शाळेच्या छतावर पाण्याच्या टाकीत पाईप सोडताना ही अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. या अपघातामुळे संपूर्ण केज शहर आणि बीड जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे.

उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली
मिळालेल्या माहितीनुसार, रोजा मोहल्ला येथील शाळेत विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा टँकर आला होता. विद्यार्थ्यांची तहान भागावी यासाठी मुबशिर सर स्वतः छतावर जाऊन पाण्याच्या टाकीत पाईप सोडत होते. याच वेळी त्यांचा स्पर्श तेथून गेलेल्या जिवंत वीज तारेला झाला. विजेचा जोरदार धक्का बसल्यामुळे ते जागीच खाली कोसळले. उपस्थित लोकांनी त्यांना तातडीने केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

मुलीच्या लग्नापूर्वीच पितृछत्र हरपले
मुबशिर सर हे अत्यंत मनमिळाऊ, शांत आणि विद्यार्थ्यांबद्दल प्रचंड जिव्हाळा असणारे व्यक्तिमत्त्व होते. सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात ते नेहमी पुढे असायचे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, दोन मुले आणि दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांच्या एका मुलीचा नुकताच साखरपुडा झाला असून लवकरच तिचा विवाह पार पडणार होता. घरात लग्नाची लगबग सुरू असतानाच कर्त्या पुरुषावर काळाने झडप घातल्याने इनामदार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका आदर्श शिक्षकाने शाळेत सेवा बजावत असतानाच जगाचा निरोप घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.