केज: तालुक्यातील साळेगाव येथे सुरू असलेल्या अवैध मटका अड्ड्यावर केज पोलिसांनी छापा टाकून रोख रकमेसह सुमारे नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत मटका खेळवणाऱ्या एका बुकीला रंगेहात ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

गुप्त माहितीच्या आधारे कारवाई

साळेगाव शिवारातील गांजी पाटी लगत असलेल्या एका हॉटेलशेजारी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररीत्या मटका खेळला व खेळवला जात असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर यांना मिळाली होती. या खात्रीशीर माहितीच्या आधारे सपोनि महेश क्षीरसागर आणि पोलीस जमादार पुरुषोत्तम शेप यांनी २० सप्टेंबर रोजी संबंधित ठिकाणी अचानक धाड टाकली.

मुद्देमाल जप्त, जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल

या कारवाईदरम्यान पोलिसांनी मटका खेळवताना गोविंद आकुसकर याला जागेवरच ताब्यात घेतले. त्याच्याकडून रोख रक्कम आणि मटक्याची साधने असा एकूण सुमारे ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गोविंद आकुसकर याच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.