अंबाजोगाई / लातूर : लातूर शहरातील कन्हेरी चौक भागातून एका प्राध्यापकाचे अपहरण करून एका महिलेशी असलेल्या प्रेमसंबंधाच्या संशयावरून त्याला अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथील खडी केंद्रावर आणून बेदम मारहाण करत निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोल्हापूर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले माधव ऊर्फ नितीन धनाजी संगमे (वय ३२) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपहरण करून खडी केंद्रावर बेदम मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत माधव संगमे हे आपल्या लहान भावाच्या साखरपुड्याच्या तयारीसाठी गावी आले होते. रविवारी दुपारी त्यांना फोन करून विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात बोलावून घेण्यात आले. त्यानंतर आरोपी पृथ्वीराज देशमुख, धवल देशमुख, प्रथमेश रेड्डी आणि आदित्य भालके (सर्व रा. लातूर) यांनी त्यांचे चारचाकी वाहनातून अपहरण केले. एका महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून आरोपींनी माधवला बर्दापूर येथील खडी केंद्रावर नेले. तेथे त्याला लोखंडी रॉड, बेल्ट आणि काठ्यांनी अमानुष मारहाण केली.

रुग्णालयात बनाव फसला

गंभीर मारहाणीत माधव बेशुद्ध पडल्यानंतर आरोपी आदित्य भालके याने त्याला लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून माधवला मृत घोषित केले. सुरुवातीला बर्दापूरजवळ हा तरुण जखमी अवस्थेत सापडल्याचा बनाव आरोपीने रचला, मात्र रुग्णालयात उपस्थित असलेल्या पोलिसांनी संशयावरून चौकशी करताच संपूर्ण धक्कादायक प्रकार समोर आला. मयताचा लहान भाऊ नरेंद्र संगमे याच्या फिर्यादीवरून शिवाजी नगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक संतोष पाटील पुढील तपास करत आहेत.