बीड: दुष्काळ आणि नापिकीमुळे पोटाची खळगी भरण्यासाठी गाव सोडून निघालेल्या बीड जिल्ह्यातील तीन ऊसतोड मजुरांचा २९ ऑक्टोबर रोजी वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत दुर्दैवी मृत्यू झाला. अवघ्या २४ तासांत कर्नाटक, कोल्हापूर आणि कारखान्याकडे जाणाऱ्या मार्गावर घडलेल्या या भीषण दुर्घटनांमुळे ऊसतोड कामगारांच्या प्रवासातील व कामाच्या ठिकाणच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
कर्नाटक व कोल्हापूरमध्ये काळाचा घाला
वडवणी तालुक्यातील टोकेवाडी येथील सोनाली फड या कर्नाटकातील महात्मा गांधी साखर कारखान्यावर ऊसतोडणीच्या कामावर असताना बैलगाडीच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाल्या. तर दुसरी घटना कोल्हापूर जिल्ह्यातील गुरुदत्त साखर कारखान्यावर घडली असून, केज तालुक्यातील वडमाऊली येथील फुलचंद गायकवाड यांचा ट्रॅक्टर-ट्रेलरमधून तोल जाऊन खाली पडल्याने मृत्यू झाला. तिसऱ्या दुर्घटनेत केज तालुक्यातील सासुरा येथील हनुमंत रामभाऊ पाळवदे हे दौलत साखर कारखान्याकडे जात असताना मार्गातच झालेल्या अपघातात त्यांचा जीव गेला.
मजुरांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची?
जिल्ह्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती धोक्यात आल्याने दरवर्षी हजारो कुटुंबे पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकात स्थलांतरित होतात. मात्र, बैलगाडी आणि ट्रॅक्टरमधून होणारी असुरक्षित वाहतूक आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या साधनांचा अभाव यामुळे कामगारांना थेट जीवावर उदार होऊन काम करावे लागत आहे. भाकरीच्या शोधात निघालेल्या या मजुरांच्या जाण्याने तीन निष्पाप कुटुंबांचा आधार हिरावला असून, साखर कारखाने आणि प्रशासनाने मजुरांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना व आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी तीव्र होत आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!