बीड: जिल्ह्यात घरफोडी आणि वाहन चोरीचे सत्र चालवणाऱ्या जालना जिल्ह्यातील सराईत आंतरजिल्हा टोळीचा बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी सापळा रचून टोळीतील चार जणांना जेरबंद केले असून त्यांच्याकडून तब्बल ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे नेकनूर, धारूर, केज आणि दिंद्रुड पोलीस ठाण्यांत दाखल असलेले एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत.

सीसीटीव्ही आणि खबऱ्यांच्या जाळ्यामुळे लागला छडा

नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या समांतर तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता संशयित चार आरोपींच्या हालचाली आणि पेहरावावरून पोलिसांना सुगावा लागला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय खबऱ्यांच्या आधारे माहिती काढली असता बालसिंग अमलरसिंग टाक (वय ३०), नानकसिंग मगबलसिंग बावरी (वय २२), अरूणसिंग जगतापसिंग बावरी (वय २०, तिघे रा. तीर्थपुरी, ता. घनसांगवी, जि. जालना) आणि इरफान बनिमियाँ सय्यद (वय २०, रा. रूई, ता. अंबड, जि. जालना) यांनी हे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले.

गेवराई बायपासवर सिनेमॅटिक सापळा

आरोपी इरफान सय्यद याच्या लाल-काळ्या रंगाच्या टीयूव्ही वाहनातून सर्व आरोपी जालना-गेवराई मार्गाने बीडकडे येत असल्याची पक्की माहिती पथकाला मिळाली. पोलिसांनी गेवराई बायपास येथे तात्काळ सापळा रचून संशयित वाहन अडवले आणि चारही आरोपींना ताब्यात घेतले. खाक्या दाखवून चौकशी करताच त्यांनी नेकनूर, धारूर, दिंद्रुड येथील घरफोड्यांसह केज पोलीस ठाण्यांतर्गत झालेली वाहन चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींसह ९ लाख रुपयांचा मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी नेकनूर पोलिसांच्या स्वाधीन केला आहे.

पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहायक पोलीस अधीक्षक व्यंकटराम व पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, अंमलदार बप्पासाहेब घोडके, जफर पठाण, महेश जोगदंड, दिलीप गित्ते, गणेश मराडे आणि विकी सुरवसे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.