बीड: जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाने आक्रमक पवित्रा घेतला असून दोन सराईत गुंडांविरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये (झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायदा) कठोर कारवाई करण्यात आली आहे. माजलगाव येथील अक्षय नरेंद्र मेंडके आणि आष्टी तालुक्यातील अजिनाथ उर्फ पप्पू दहिफळे या दोन गुन्हेगारांविरुद्ध सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांना जिल्हादंडाधिकारी विवेक जॉन्सन यांनी मंजुरी दिली आहे.

माजलगावच्या अक्षय मेंडकेची हर्सूल कारागृहात रवानगी

माजलगाव शहरातील तानाजी नगर येथील रहिवासी असलेला २८ वर्षीय अक्षय नरेंद्र मेंडके याच्यावर तिर्रट जुगार चालवणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे, दंगल घडवणे, फसवणूक आणि जातीवाचक शिवीगाळ करणे अशा स्वरूपाचे तब्बल नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती, मात्र त्याच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही. अखेर माजलगाव शहर पोलिसांच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होताच स्थानिक गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेतले असून त्याची छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या पप्पू दहिफळेवरही कारवाई

दुसऱ्या कारवाईत आष्टी तालुक्यातील महिंदा येथील २६ वर्षीय अजिनाथ उर्फ पप्पू बाबासाहेब दहिफळे याच्याविरुद्ध धोकादायक व्यक्ती सदराखाली अंमळनेर पोलिसांनी एमपीडीएचा प्रस्ताव सादर केला होता. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, विनयभंग, घातक शस्त्रांनी मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ यांसारखे सहा गंभीर गुन्हे नोंद आहेत. वारंवार प्रतिबंधक कारवाई करूनही गुन्हेगारी सुरूच ठेवणारा हा गुन्हेगार सध्या न्यायालयीन कोठडीत असून, त्यालाही स्थानबद्ध करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक अनंत्रे, विश्वजीत खुळे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली माजलगाव शहर, अंमळनेर आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही धडक कामगिरी पार पाडली.

दरम्यान, जिल्ह्यात वाळूची अवैध तस्करी, गुटखा विक्री, धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणारे समाजकंटक, खंडणीखोर तसेच जुगार आणि हातभट्टी चालवणाऱ्या गुन्हेगारांवर यापुढेही एमपीडीए आणि मोक्का अंतर्गत अशीच धडक कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशारा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिला आहे.