अंबाजोगाई : शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि रस्ते मोकळे करण्यासाठी आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने धडक अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. शहरातील अण्णाभाऊ साठे चौक, परळी वेस, मांडवा रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील रस्त्यांवर वाढलेली अनधिकृत बांधकामे आज जेसीबीच्या साहाय्याने हटवण्यात आली. या धडक कारवाईमुळे अनेक दिवसांपासून कोंडीत अडकलेल्या मुख्य रस्त्यांनी अखेर मोकळा श्वास घेतला आहे.
जेसीबीच्या साहाय्याने अनधिकृत बांधकामे निष्कासित
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकाने सकाळपासूनच नियोजनबद्ध पद्धतीने या मोहिमेला सुरुवात केली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला थाटलेली दुकाने, घरांच्या पुढे काढण्यात आलेल्या वाढीव भिंती, रस्त्याला अडथळा ठरणारी झाडे तसेच इतर तात्पुरती व पक्की अतिक्रमणे थेट जेसीबी फिरवून हटवण्यात आली. सार्वजनिक रस्त्यांवर अतिक्रमण करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर प्रशासनाने थेट हातोडा चालवला.
तगडा पोलीस बंदोबस्त तैनात
कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस बंदोबस्तात सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी ही मोहीम शांततेत पार पाडली. या अचानक झालेल्या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांमध्ये धावपळ उडाली असली, तरी मुख्य रस्ते रुंद व मोकळे झाल्याने शहरातील नागरिक व वाहनधारकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!