अंबाजोगाई: बीड तालुक्यातील नेकनूरनजीक अहिल्यानगर-अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दुपारच्या सुमारास टिपर आणि पिकअप वाहनाची जोरदार धडक होऊन अत्यंत भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत पिकअपमधील अंबाजोगाई येथील दोन सख्ख्या भावांसह एकूण तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, टिपर चालक गंभीर जखमी झाला आहे. याशिवाय पिकअपमधून नेण्यात येणाऱ्या अनेक जनावरांचाही या अपघातात तडफडून मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई शहरातील बाराभाई गल्ली येथे राहणारे हनीफ शौकत कुरेशी (वय २२) आणि आरेफ शौकत कुरेशी (वय २०) हे दोघे भाऊ पिकअपमधून जनावरे घेऊन जात होते. नेकनूरजवळ त्यांच्या पिकअपला भरधाव टिपरने जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यात दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला. या धडकेत हनीफ आणि आरेफ या दोन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेल्या आणखी एका अज्ञात व्यक्तीचाही या दुर्घटनेत बळी गेला आहे, तर जखमी टिपर चालकावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघातात पिकअपमधील मुक्या जनावरांनाही प्राणाला मुकावे लागले आहे. प्राथमिक माहितीनुसार, दोन गायी आणि तीन बैलांचा या भीषण धडकेत मृत्यू झाला आहे. एकाच घरातील दोन तरुण भावांचे अचानक अपघाती निधन झाल्याने अंबाजोगाई शहरात हळहळ व्यक्त केली जात असून कुरेशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस या अपघाताचा सविस्तर तपास करत आहेत.
















प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!