मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध एसआयआर (SIR) प्रक्रिया आणि राजीनाम्याच्या मागणीवरून राज्य व दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान, भारत निवडणूक आयोगाने मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रमास मुदतवाढ दिली आहे. महाराष्ट्रात १ ऑक्टोबर २०२६ च्या अर्हता दिनांकावर आधारित प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती सादर करण्यासाठी आता २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

या सुधारित वेळापत्रकानुसार दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केली जाईल. मात्र, अंतिम मतदार यादी पूर्वीच्या वेळापत्रकानुसारच १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदार यादीतून नाव वगळल्याच्या अनेक तक्रारी येत असताना आयोगाचा हा निर्णय दिलासादायक ठरला आहे. दुसरीकडे, एसआयआर प्रक्रियेतील मतदार वगळणीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दोन रिट याचिका दाखल झाल्या असून, निवडणूक आयोगाचे निर्णय जनहित आणि सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या निकालांच्या विरोधात असल्याचा दावा यात करण्यात आला आहे.