नेकनूर: मांजरसुंबा येथे चार दिवसांपूर्वी पलटी झालेला तांदळाने भरलेला ट्रक नेकनूर पोलिसांनी ताब्यात घेतला असून, त्यातील धान्याबाबत अद्यापही गूढ कायम आहे. हा तांदूळ रेशनचा आहे, अंगणवाडीचा सकस आहार आहे की अन्य कुठला, याविषयी नागरिकांमध्ये तीव्र संशय व्यक्त होत आहे. शुक्रवारपासून हा ट्रक तांदळाच्या गोण्यांसह पोलीस ठाण्याच्या आवारात उभा असून पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.


अपघातानंतर उघडकीस आला प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार, १८ सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास पाटोद्याकडून मांजरसुंबाकडे जाणारा ट्रक (क्रमांक ०९.६८५५) चालकाच्या निष्काळजीपणामुळे वळणावर पलटी झाला. अपघाताचा आवाज ऐकून जवळच असलेल्या खंडाळा आणि जाधव वस्ती येथील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर तांदळाच्या गोण्या आढळून आल्या. हा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असल्याचा संशय आल्याने स्थानिकांनी लगेच नेकनूर पोलिसांना पाचारण केले.


दुसऱ्या वाहनातून माल हलवण्याचा प्रयत्न

अपघातानंतर काही वेळातच घटनास्थळी दोन अनोळखी वाहने दाखल झाली आणि त्यांनी चालकाला सोबत नेले. त्यानंतर रात्री दोन वाजेच्या सुमारास आणखी एक ट्रक (क्रमांक एमएच ४४ यु १९०३) तेथे पोहोचला आणि त्या अपघातग्रस्त ट्रकमधील तांदूळ दुसऱ्या वाहनात हलवण्याचा प्रयत्न करण्यात आला. माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही वाहने आणि तांदळाचा साठा ताब्यात घेऊन नेकनूर पोलीस ठाण्यात आणून लावला.


अन्नधान्याच्या स्रोताबाबत तपास सुरू

हा साठा नेमका कुठून आणला जात होता आणि तो रेशनच्या धान्याचा काळाबाजार आहे का, याबाबत पोलिसांकडून अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या समन्वयाने पडताळणी सुरू आहे. चार दिवस उलटूनही धान्याचा स्रोत अधिकृतरीत्या समोर न आल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू असून पोलीस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.