बीड: जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये आणि शाळांच्या परिसरात सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायद्याची (कोटपा) कठोर अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत. शाळांच्या शंभर मीटर परिसरात कोणत्याही प्रकारचे अंमली व तंबाखूजन्य पदार्थ आढळल्यास किंवा नियमांचे उल्लंघन करून मावा खाऊन थुंकल्यास संबंधित मुख्याध्यापकांनी संबंधितांवर थेट दंडात्मक कारवाई करावी, असा सक्त इशारा त्यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
आरोग्य विभागापासून मोहिमेची सुरुवात
शासकीय कार्यालयांची स्वच्छता आणि तंबाखूमुक्ती ही मोहीम प्राधान्याने आरोग्य विभागापासून सुरू करून संपूर्ण जिल्ह्यात राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. शाळकरी मुले व्यसनांकडे वळू नयेत यासाठी शाळांचा परिसर पूर्णपणे तंबाखूमुक्त ठेवणे बंधनकारक असून, या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्तीविषयक जनजागृतीपर कार्यक्रम नियमितपणे राबवावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
प्रशासकीय यंत्रणांना समन्वयाचे निर्देश
या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांच्यासह कृषी, शिक्षण, आरोग्य, अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी मोहीम अधिक प्रभावीपणे चालवावी, असे निर्देश देत जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागांमार्फत आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईचा सविस्तर आढावाही घेतला.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!