अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. अनिशा वसंत हांगे हिची संसदेच्या 'संविधान भवनात' भाषण करण्यासाठी निवड झाली आहे. उद्या, ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त तिला संसदेत आपले विचार मांडण्याची मोठी संधी मिळाली आहे. संसदेत अशा प्रकारे प्रतिनिधित्व करणारी ती महाविद्यालयाची पहिलीच विद्यार्थिनी ठरल्याने अंबाजोगाईसह बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

अनिशा ही राज्यशास्त्र (M.A.) विभागाची विद्यार्थिनी असून, यापूर्वीही तिने अनेक जिल्हा आणि केंद्रीय युवक महोत्सवांमध्ये यशस्वी कामगिरी करत महाविद्यालयाचे नाव उंचावले आहे. तिला प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख, प्रा. रमेश सोनवळकर, डॉ. संपदा कुलकर्णी, डॉ. ज्ञानेश्वर सोनवणे, डॉ. शैलजा बरूरे आणि इतर प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. तिच्या या ऐतिहासिक निवडीबद्दल योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर, उपप्राचार्य डॉ. रमेश सोनटक्के आणि सर्व प्राध्यापक वर्गाने तिचे भरभरून कौतुक केले आहे.