बीड: नीती आयोग, भारत सरकार यांच्या आकांक्षी जिल्हा व तालुका कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या प्रांगणात येत्या ४ आणि ५ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘आकांक्षा हाट - वोकल फॉर लोकल’ या भव्य विक्री व प्रदर्शन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारी व यशस्वी नियोजनासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहेमान यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच आढावा बैठक संपन्न झाली. विकास निर्देशांकात सुधारणा करणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि स्थानिक कारागीर व बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

स्थानिक उत्पादनांचे भव्य प्रदर्शन व विक्री

या दोन दिवसीय प्रदर्शनात महिला बचत गट, कृषी विभागामार्फत स्थापन केलेले शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीओ/एफपीसी) तसेच महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत कार्यरत गटांच्या उत्पादनांची थेट विक्री केली जाणार आहे. आगामी सणासुदीच्या आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिला बचत गटांनी तयार केलेला चवदार दिवाळी फराळ, आकर्षक सजावटीच्या वस्तू आणि विविध ग्रामीण उत्पादने नागरिकांसाठी खास उपलब्ध असणार आहेत. या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होईल.

शेतकऱ्यांसाठी चर्चासत्रे व माहितीपर दालने

प्रदर्शनादरम्यान दुष्काळ व पाणीटंचाई व्यवस्थापनावर पशुसंवर्धन विभाग, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी) आणि विविध स्वयंसेवी संस्थांमार्फत प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार आहेत. सोबतच मृदा व जलसंधारण, सेंद्रिय शेती, रेशीम शेती आणि दुष्काळी भागातील फळबाग व्यवस्थापन यांसारख्या शेतकरीहिताच्या विषयांवर अभ्यासपूर्ण चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत.

या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक यांच्यासह कृषी, पशुसंवर्धन, रेशीम विकास, आरोग्य, महिला व बालकल्याण आणि जलसंधारण विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. वडवणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक बाराखोते यांनी आकांक्षित तालुक्याच्या वतीने सर्व शासकीय यंत्रणा आणि सर्वसामान्य जनतेने या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहेमान यांनी केले आहे.