बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात बेकायदेशीररित्या फटाके बनवणाऱ्या आणि साठवणूक करणाऱ्या एका अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून तब्बल ९ लाख ३६ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विनापरवाना फटाक्यांचा साठा आणि निर्मिती सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, २९ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस उपअधीक्षक पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कडा (ता. आष्टी) येथील नलावडे वस्तीतील एका चालू बांधकामावर छापा मारला. तिथे शेख शफी बनेमियाँ (वय ४८, रा. बाजारतळ, कडा) हा व्यक्ती कोणतीही अधिकृत परवानगी नसताना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररित्या फटाके बनवताना आणि साठवताना आढळून आला.
पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे ७१ प्रकारचे विविध फटाके, फटाके बनवण्याचे साहित्य, कागदी पुठ्ठे आणि दारूगोळा जप्त केला. मानवी जीविताला धोका निर्माण होईल अशा प्रकारे स्फोटकांची साठवणूक केल्याप्रकरणी आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५, २८८ आणि भारतीय स्फोटक पदार्थ अधिनियम १८८४ च्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे अवैध फटाके व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!