नवी दिल्ली/बीड: इयत्ता आठवीच्या एनसीईआरटीच्या इतिहास पुस्तकामध्ये मराठा साम्राज्याच्या नकाशात करण्यात आलेल्या बदलांबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत होती. या प्रकरणी खा.बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, एनसीईआरटीने संबंधित वादग्रस्त नकाशा पाठ्यापुस्तकातून हटविण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य आणि पेशवेकाळात भारतीय उपखंडात झालेला त्याचा विस्तार हा भारतीय इतिहासाचा अत्यंत गौरवशाली अध्याय आहे. मात्र, इयत्ता आठवीच्या 'एक्सप्लोरिंग सोसायटी: इंडिया अँड बियॉंड' या पाठ्यपुस्तकात सन १७५९ च्या मराठा साम्राज्याच्या विस्ताराचा जो नकाशा दिला होता, त्यात विशेषत: राजस्थानमधील जैसलमेर क्षेत्राबाबत दर्शवलेल्या माहितीवरून विविध आक्षेप आणि टिप्पण्या प्राप्त झाल्या होत्या. या बदललेल्या स्वरूपामुळे मराठा साम्राज्याचा विस्तार आणि प्रभाव कमी दाखवला जात असल्याची भावना निर्माण होऊन महाराष्ट्रात तीव्र संताप व्यक्त होत होता. या गंभीर प्रकरणाची दखल घेत बीडचे खा.बजरंग सोनवणे यांनी १६ एप्रिल २०२६ रोजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहून या प्रकारावर तात्काळ आक्षेप नोंदवला होता. ऐतिहासिकदृष्टीने योग्य आणि प्रमाणिक नकाशा पूर्ववत करावा, अशी मागणी त्यांनी केली होती. खा.सोनवणे यांच्या या पत्राची गंभीर दखल घेत शिक्षण मंत्रालयाने आणि एनसीईआरटीने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली होती. या उच्चस्तरीय समितीने प्राप्त झालेल्या सर्व सूचना व मानदंडांचे परीक्षण करून संबंधित नकाशा पाठ्यपुस्तकातून मागे घेण्याची आणि विद्यार्थ्यांच्या हितातून तो पूर्णपणे वगळण्याची शिफारस केली. केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जयंत चौधरी यांनी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी खा.बजरंग सोनवणे यांना पत्र पाठवून या कारवाईची अधिकृत माहिती दिली आहे. तसेच, भारतीय इतिहासातील या महत्त्वपूर्ण अध्यायाला देशातील सर्व विद्यार्थी वर्गासमोर योग्य गरिमा आणि पूर्ण सन्मानाने मांडले जाईल, असे स्पष्ट करत मराठा इतिहासातील महत्त्वपूर्ण घटनाक्रम योग्य ठिकाणी सामाविष्ट करण्यासाठी तज्ज्ञ समितीच्या माध्यमातून काम सुरू असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
'एनसीईआरटी' ने पाठ्यपुस्तकातून वादग्रस्त नकाशा वगळला
केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडून खा.बजरंग सोनवणे यांना पाठविलेल्या उत्तरात माहिती
१ मि. वाचन

आमचे WhatsApp चॅनेल जॉईन करा
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर
संबंधित बातम्या
पुढे वाचा
वाचकांच्या पसंतीच्या बातम्या












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!