अंबाजोगाई: येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जाचाला कंटाळून झालेल्या आत्महत्या प्रकरणात सबळ पुराव्याअभावी आरोपी संदेश चाटे यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
घटनेची पार्श्वभूमी शेपवाडी (ता. अंबाजोगाई) येथील सुधाकर बाबुराव शेप यांचा मुलगा संग्राम शेप याने १ ऑक्टोबर २०२३ रोजी शेतातील मंदिराशेजारी असलेल्या बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी सुधाकर शेप यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संदेश चाटे यांनी ८ सप्टेंबर २०२३ रोजी भगवान बाबा चौकात संग्रामला गाठून भावाने घेतलेले ३० हजार रुपये परत करण्यासाठी धमकी दिली होती. या तक्रारीवरून चाटे यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ॲड. नितीन जाधव यांचा प्रभावी युक्तिवाद
न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. फिर्यादी पक्षातर्फे अनेक साक्षीदार तपासण्यात आले, मात्र गुन्ह्यामागील सबळ पुरावे सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला अपयश आले. आरोपीच्या वतीने ॲड. नितीन जाधव यांनी न्यायालयासमोर अत्यंत प्रभावी आणि कायदेशीर मुद्यांवर आधारित युक्तिवाद केला. फिर्यादी पक्षाच्या पुराव्यांमधील त्रुटी त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. हाच प्रबळ युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली. या संपूर्ण कायदेशीर लढ्यात ॲड. नितीन जाधव यांना ॲड. जी. व्ही. बुरकुले आणि ॲड. बाळासाहेब गायके यांनी मोलाचे सहकार्य केले .













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!