अंबाजोगाई शहरातील केज-बीड रोडवर असलेल्या महाराजा हॉटेलमध्ये जेवणाचे जुने बिल मागितल्याच्या रागातून हॉटेल चालकावर विटेने हल्ला करण्यात आल्याची संतापजनक घटना २२ ऑक्टोबर रोजी घडली. हॉटेल चालक अक्षय प्रकाश गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने पैशांची मागणी केल्याचा राग मनात धरून हा भ्याड हल्ला केल्याचे तपासात उघड झाले आहे.

याप्रकरणी अभय सावरे (रा. चनई, अंबाजोगाई) या आरोपीवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीने अक्षय गायकवाड यांना शिवीगाळ करत त्यांच्या डोक्यात वीट मारली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, हॉटेलसमोर उभी असलेली दुचाकी आणि फ्रीजवर दगड फेकून मोठे नुकसान केले. पुन्हा बिल मागितल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपीने दिली असून अंबाजोगाई शहर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.