अंबाजोगाई: शासकीय अनास्थेमुळे मोडकळीस आलेल्या जिल्हा परिषदेच्या एका प्राथमिक शाळेचा कायापालट करत सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घोडके यांनी समाजासमोर एक नवा आदर्श उभा केला आहे. शहरातील गुरुवार पेठ येथील पी.एम. श्री. जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेची दयनीय अवस्था पाहून घोडके यांनी स्वतः ५१ हजार रुपये खर्च केले, तर 'रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी'कडून ५८ हजार रुपयांचे सहकार्य मिळवून एकूण १ लाख ९ हजार रुपयांच्या निधीतून या शाळेचा संपूर्ण चेहरामोहरा बदलून टाकला आहे.
शाळेच्या भौतिक सुविधांचा कायापालट
या उपक्रमांतर्गत शाळेतील मोडकळीस आलेली स्वच्छतागृहे, तुटलेली दारे, शौचासने आणि फुटलेल्या वॉश बेसिनची पूर्ण दुरुस्ती करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था उभारण्यात आली आहे. केवळ डागडुजीवरच न थांबता संपूर्ण शाळेला आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली असून, भिंतींवर ज्ञानवर्धक व रंगीबेरंगी चित्रे रेखाटून त्या बोलक्या करण्यात आल्या आहेत. या सुशोभीकरणामुळे शालेय परिसरातील वातावरण प्रसन्न झाले असून चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे.
रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लोकार्पण
या नूतनीकृत सुविधांचे लोकार्पण रोटरीचे माजी प्रांतपाल सुधीर लातुरे, प्रांत पदाधिकारी रवींद्र बनकर, अमित वैद्य, रोटरी क्लबचे अध्यक्ष शेख शकील, सचिव राधेश्याम लोहिया, माजी अध्यक्षा रोहिणी पाठक आणि उपप्रांतपाल मोईन शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या कार्यक्रमास धनराज सोळंकी, संतोष मोहिते, प्रा. अजय पाठक, रूपेश रामावत, प्रवीण चोकडा यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एका दुर्लक्षित शाळेला लोकसहभागातून नवे जीवन मिळवून दिल्याबद्दल सर्व उपस्थितांनी राजेंद्र घोडके यांच्या सामाजिक बांधिलकीचे विशेष कौतुक केले.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!