अंबाजोगाई तालुक्यातील अंजनपूर येथे शेतकरी कुटुंबाच्या घरातून तीन अज्ञात चोरट्यांनी ५५ हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने आणि रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मण निवृत्ती तोकले (वय ६०, रा. अंजनपूर, ता. अंबाजोगाई) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. लक्ष्मण तोकले हे पत्नी, मुलगा आणि सून यांच्यासोबत राहतात. २१ ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास वीज आल्याने लक्ष्मण आणि त्यांचा मुलगा अक्षय हे शेतात मोटार चालू करण्यासाठी गेले होते. जाताना त्यांनी घराला बाहेरून कुलूप लावले होते आणि पत्नी व सून घरात झोपल्या होत्या.

२२ ऑक्टोबर रोजी रात्री सव्वाएकच्या सुमारास ते शेतातून परतले तेव्हा पत्नी आणि सून घराबाहेर शेजाऱ्यांसोबत उभ्या असलेल्या दिसल्या. सुनेने सांगितले की, दोन अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील दागिने व पैसे चोरताना ती ओरडली असता ते पळून गेले. घराबाहेर तीन तोंडाला काळा मास्क लावलेले इसम पळून जाताना दिसले. घरात जाऊन पाहणी केली असता कपाटातील ३२ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, १६ हजारांचे सोन्याचे झुंबर, २ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने आणि ५ हजार रुपये रोख असा एकूण ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

लक्ष्मण तोकले यांच्या तक्रारीवरून युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार अरुण माणिकराव मोरे हे करत आहेत.