अंबाजोगाई: महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचालनालयाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित शालेय विभागीय हॉकी स्पर्धेत येथील गोदावरी कुंकूलोळ योगेश्वरी कन्याशाळेच्या संघाने अप्रतिम कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. या घवघवीत यशामुळे कन्याशाळेचा संघ आता कोल्हापूर येथे होणाऱ्या आगामी राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेसाठी पात्र ठरला असून, अंबाजोगाईच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विजयी खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी

विभागीय स्पर्धेत योगेश्वरी कन्याशाळेच्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन घडवले. या विजयी संघात श्रावणी शिंदे, साई शिंदे, समृद्धी काळे, तेजल आपेट, शर्वरी मोरे, प्रिया गडदे, ऋग्वेदी सोनवळकर, अक्षरा बडे, वेदिका देशमुख, दर्शना जाधव, अंजली बादाडे, कल्याणी बादाडे, श्रुती शिंदे, सई धायगुडे, सिद्धी पाटील, दर्शना मंत्री, तेजस्विनी चौधरी आणि प्रांजली इथे या खेळाडूंचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंना विद्यालयाच्या क्रीडा विभाग प्रमुख अंजली रेवडकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

शाळा प्रशासन व संस्थेकडून कौतुक

राज्य पातळीवर शाळेचा आणि शहराचा लौकिक वाढवल्याबद्दल विजयी खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे. योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर, सर्व कार्यकारिणी सदस्य, मुख्याध्यापिका स्मिता धावडकर, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनींनी संघातील खेळाडूंचे अभिनंदन करत त्यांना कोल्हापूर येथील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.