कडा (प्रतिनिधी): आष्टी तालुक्यातील कडा परिसरात बेकायदेशीर वाळू वाहतुकीविरोधात आष्टी पोलिसांनी धडक कारवाई करत एक हायवा आणि चार ब्रास वाळू असा एकूण १५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सोमवारी रात्री शिराळ रोड ते तळेवस्ती मार्गावर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी चालक दादासाहेब पांडुरंग मुटकुळे आणि वाहनमालक महादेव बाबासाहेब मुटकुळे (दोघे रा. मांडेवा, ता. आष्टी) यांच्याविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कडा परिसरातील वाळू माफियांविरुद्ध केलेली ही दुसरी मोठी कारवाई ठरली आहे.

विनापरवाना वाळू वाहतूक पडली महागात

कडा परिसरातील टाकळी अमिया मार्गे बेकायदेशीर वाळूची वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती पोलीस अंमलदार भुतेकर यांना मिळाली होती. त्यांनी तात्काळ ही बाब प्रभारी अधिकारी भारत पांढरे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक नानासाहेब सूर्यवंशी आणि पथकाने रात्री आठच्या सुमारास संशयित वाहनाची नाकाबंदी केली. तपासणीदरम्यान चालकाकडे वाळू उपसा अथवा वाहतुकीचा कोणताही शासकीय रॉयल्टी परवाना मिळून आला नाही. त्यामुळे पोलिसांनी १५ लाख रुपयांचा भारत बेंझ हायवा आणि २० हजार रुपयांची चार ब्रास वाळू जप्त करून आष्टी पोलीस ठाण्यात आणली.

वाळू तस्करांवर वचक; मागील कारभाराची चौकशीची मागणी

पोलीस अधीक्षक नवनीत कांवत आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईत सपोनि सूर्यवंशी, पोहेकॉ. आहेर, पोना. भुतेकर, पोहेकॉ. बनसोडे, पोअं. अक्षय लोंढे आणि तपास अधिकारी पोहेकॉ. अमोल नवले यांचा सहभाग होता. दरम्यान, या भागातील वाळू तस्करीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी ही मोहीम सातत्याने सुरू ठेवावी, तसेच यापूर्वी अशा हालचालींकडे दुर्लक्ष करणाऱ्या स्थानिक कारभाराचीही वरिष्ठ पातळीवरून चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.