केज: तालुक्यातील जिवाचीवाडी आणि चिखलबीड शिवारात पुरलेला महिलेचा मृतदेह जंगली प्राण्यांनी उकरून बाहेर काढल्याने उघडकीस आलेल्या थरारक खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) यश आले आहे. संबंधित महिलेचा खून तिच्या प्रियकराच्या मुलाने आपल्या मित्रांच्या मदतीने केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून, पोलिसांनी चौघा मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
जंगली प्राण्यांनी मृतदेह उकरल्याने फुटली वाचा
शिरूर येथील माहेर असलेल्या शहाबाई बाबुराव चौरे (वय ४०) यांचा विवाह १७ वर्षांपूर्वी तुकुचीवाडी येथील बाबुराव चौरे यांच्याशी झाला होता. मात्र, गेल्या सात वर्षांपासून त्या पतीला सोडून जिवाचीवाडी येथील बाळकृष्ण चौरे यांच्यासोबत पती-पत्नीसारख्या राहत होत्या. सुमारे दोन आठवड्यांपूर्वी अज्ञात कारणावरून शहाबाई यांचा गळा आवळून खून करण्यात आला. मारेकऱ्यांनी मृतदेह सुरुवातीला एक दिवस भुस्कटात लपवून ठेवला आणि दुसऱ्या दिवशी पोत्यात भरून जिवाचीवाडी-चिखलबीड सीमेवरील निर्जनस्थळी नेऊन पुरला. मात्र, खड्डा उथळ असल्याने मृतदेहाची दुर्गंधी पसरली आणि जंगली प्राण्यांनी तो उकरून बाहेर ओढल्याने ही घटना उघडकीस आली.
पोलिसांचा तातडीने तपास आणि संशयितांची धरपकड
घटनेची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सदर घटनास्थळ वडवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने प्राथमिक पंचनाम्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून वडवणी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखा, वडवणी आणि केज पोलिसांनी समांतर तपास सुरू करून सुरुवातीला दोन संशयितांना ताब्यात घेतले.
चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल
संशयितांकडे सखोल आणि कौशल्याने चौकशी केली असता, नवनाथ विलास चौरे, गोविंद बाळकृष्ण चौरे (प्रियकराचा मुलगा), तुकाराम बाबासाहेब चौरे आणि विशाल जाधवर यांनी संगनमताने शहाबाई यांचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पुरल्याची कबुली दिली. स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने या चारही आरोपींना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याविरोधात वडवणी पोलीस ठाण्यात खून आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!