आष्टी तालुक्यातील मोराळा येथे जमिनीच्या वादातून एका ३५ वर्षीय तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जमीन आमच्या नावावर करून दे, अन्यथा तुझ्यावर छेडछाडीचा खोटा गुन्हा दाखल करू, अशी गंभीर धमकी देत चार जणांनी या तरुणाला बेदम मारहाण केली आहे. ही घटना मोराळा येथील जिल्हा परिषद शाळेसमोर घडली.
फिर्यादी दादासाहेब रामदास सानप यांच्याकडे गावातीलच आरोपी सुरेखा गर्जे, वैष्णवी गर्जे, उमेश गर्जे आणि पैठणचा कृष्णा नागरगोजे यांनी जमिनीची मागणी केली होती. यावर सानप आणि त्यांच्या नातेवाईकांनी 'तुम्ही कायदेशीर मार्गाने कोर्टातून आदेश आणा, त्यानुसार आम्ही जमीन देऊ' असे स्पष्ट केले. या उत्तराचा राग आल्याने आरोपी उमेश गर्जे याने सानप यांच्या डोक्यात थेट कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच इतर तीन आरोपींनी सानप व त्यांच्या सोबतच्या साक्षीदारांना लाथाबुक्क्यांनी, लाकडाने आणि दगडाने अमानुष मारहाण केली.
जमीन नावावर न केल्यास पोलिसांत छेडछाडीची खोटी तक्रार देण्याची धमकीही आरोपींनी दिली. या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी सानप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात चारही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार काळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!