अंबाजोगाई शहरातील पोखरी रोडवरील तथागत चौकात जमिनीच्या कारणावरून एका मजुराला बापा-लेकाने अमानुष मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला आहे. जमिनीचे हक्क मुलीच्या नावावर करण्यासाठी दबाव टाकत डोक्यात दगड घालून तरुणाला गंभीर जखमी करण्यात आले असून, अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तानाजी विजयकुमार वाघमारे (वय ३८, सध्या रा. बलुतेचा मळा, अंबाजोगाई) असे जखमी फिर्यादीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी (११ सप्टेंबर) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास तानाजी हे तथागत चौकात असताना बालाजी शिंदे आणि त्याचा मुलगा ओमकार शिंदे (दोघे रा. राधानगरी, अंबाजोगाई) यांनी संगनमत करून त्यांना गाठले. 'तुझ्या नावावर असलेली जमीन माझ्या मुलीच्या नावावर करून दे' असा तगादा लावत आरोपींनी तानाजी यांना अश्लील शिवीगाळ केली व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण सुरू केली. यावेळी ओमकार शिंदे याने रस्त्याच्या कडेला पडलेला मोठा दगड उचलून तानाजी यांच्या डोक्यात घातला आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तानाजी यांनी या जीवघेण्या हल्ल्यानंतर तात्काळ पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार बालाजी आणि ओमकार शिंदे या दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या हिंसक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस हेड कॉन्स्टेबल गायकवाड या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.