केज: तुझ्या नावावर असलेली शेतजमीन माझ्या नावे का करून दिली नाही, या रागातून एका पुतण्याने आपल्या वृद्ध चुलतीसह आजीला लोखंडी गजाने बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना तालुक्यातील केवड येथे घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोन्ही वृद्ध महिलांवर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आरोपी पुतण्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जमिनीच्या वादातून दोघी माय-लेकींवर प्राणघातक हल्ला

केवड येथील रहिवासी गोदावरी नानासाहेब सपाटे (वय ६० वर्षे) यांनी त्यांच्या नावावर असलेली जमीन इतर व्यक्तीच्या नावे केली होती. याचा राग मनात धरून त्यांचा पुतण्या दत्तात्रय दशरथ सपाटे याने २१ सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास त्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले आणि दत्तात्रयने गोदावरी यांच्यावर लोखंडी गजाने हल्ला चढवला. भांडणाचा आवाज ऐकून गोदावरी यांची वृद्ध आई सुशीलाबाई थोरात या घराबाहेर आल्या असता, संशयित आरोपीने त्यांनाही गजाने मारहाण करून गंभीर दुखापत केली.

उपजिल्हा रुग्णालयात उपचार, पोलिसांत गुन्हा दाखल

हल्ल्यात रक्तबंबाळ झालेल्या दोन्ही वृद्ध माय-लेकींना तात्काळ केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान पोलिसांनी जखमींचा जबाब नोंदवून घेतला. दिलेल्या जबाबावरून संशयित आरोपी दत्तात्रय सपाटे याच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६०२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ११८(१), ३५१ आणि ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल महावीर सोनवणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.